ललिता पाटील
मूळच्या ठाण्याच्या असणाऱ्या 39 वर्षीय ललिता पाटील यांचे भौतिकशास्त्रात पदवी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर वयाच्या 20 व्या वर्षीच लग्न झाले. मध्यमवर्गीय कौंटुबिक पार्श्वभूमी असलेल्या ललिता यांच्या पतीची गॅस एजन्सी होती. आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हायचे असल्याने त्या उदरनिर्वाहासाठी घरातूनच मुलांच्या ट्युशन्स घ्यायच्या.
दरम्यान, राज्य सरकारने नव्याने टाकलेल्या गॅस पाईपलाईन प्रकल्पामुळे गॅस सिलिंडरची विक्री कमी झाली. घरातील खर्च, मुलांची शिक्षणं यासाठी उत्पन्नाचा पर्यायी स्रोतही हवा होता. संसाराला हातभार लागावा म्हणून ललिता यांनी फार्मसीमध्ये पूर्णवेळ नोकरी करण्यास सुरुवात केली. मात्र तरीही नोकरीत त्यांच मन रमत नव्हतं. त्यांना स्वतःच काहीतरी सुरु करण्याची इच्छा होती.
त्यांच्या स्वयंपाक कौशल्याचे कुटुंबिय, नातेवाईक, मित्रमंडळी यांच्याकडुन अनेकदा कौतुक होत होते. ठाणे परिसरात नोकरदार वर्ग आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने असल्याने टिफिन सेवेला भरपूर वाव होता. यातून कल्पना सुचत त्यांनी 2000 रुपयांची गुंतवणूक केली. जाहिरातीसाठी 500 रुपये खर्च करत 2016 मध्ये घरातूनच टिफिन सर्व्हिस सुरू केली.
ललिता व्यवसाय करत होत्या मात्र तरीही त्यांना लोक उद्योजक म्हणून स्वीकारायला तयार नव्हते. घरुनच जेवण बनवून विकतात म्हणजे त्या गृहिणीच आहेत असे लोक म्हणायचे. ललिता यांना उद्योजक महिला म्हणून सन्मान हवा होता. त्यांना त्यांच्या कामाचा विस्तार करायचा होता. त्यासाठी पैशांची गरज होती, मात्र त्यांच्याकडे फारशी बचतही नव्हती आणि कोणीही कर्ज द्यायला तयार नव्हते.
अशातच साधारण वर्षभरानंतर 2019 मध्ये एके दिवशी वृत्तपत्रात ब्रिटानिया इंडस्ट्रीजच्या स्टार्टअप स्पर्धेची जाहिरात आली, ज्यात विजेत्याला 10 लाख रुपयांचे बक्षीस होते. त्यात सहभाग घेत त्यांनी स्टार्टअप स्टोरी सांगून बक्षीस जिंकले. कर कपातीनंतर त्यांच्या बँक खात्यात 7 लाख रुपये ट्रान्सफर झाले. याचाच त्यांनी व्यवसायासाठी भांडवल म्हणून उपयोग केला. टिफिन सर्व्हिसमुळे त्यांच्याकडे फूड लायसन्स होतेच. भांडवल मिळाल्यानंतर त्यांनी जुलै 2019 साली ठाणे कोपरी येथे ‘घरची आठवण’ हे स्वतःचे रेस्टॉरंट सुरू केले.
घरगुती जेवण, खाद्यपदार्थ व टिफीन सर्विस देऊन ललिता दर महिना किमान 6-7 लाख रुपयांचा व्यवसाय करतात. तर त्यांच्या व्यवसायाची वार्षिक कमाई 1 कोटी आहे. अल्पावधीतच व्यवसायाची अनपेक्षितपणे वाढ झाल्याने ललिता यांना पाठिंबा देण्यासाठी त्यांच्या पतीने देखील गॅस एजन्सीचा व्यवसाय सोडला. आणि आता ते देखील पूर्णवेळ ललिता यांच्यासोबत काम करत आहेत. त्याचप्रमाणे ललिता यांनी अजून दहा जणांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे.
एकेकाळी गृहीणी असणाऱ्या मात्र घरगुती जेवणाची विक्री करुन आता वार्षिक एक कोटींची कमाई करणाऱ्या व महिला उद्योजिका म्हणून नावारुपास आलेल्या ठाण्याच्या ललिता पाटील यांचा प्रवास तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करुन नक्की कळवा.