marathistatus.co

गुंतवणुकीच्या नावाखाली सख्ख्या भावांकडून २० लाखांचा गंडा

   

आजकाल शेअर मार्केटमधील गुंतवणुकीच्या नावाखाली अनेक भामटे पैसे उकळत असल्याच्या घटना राजरोसपणे घडत आहेत. अश्याच प्रकारे शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणूक करुन दामदुप्पटीने पैसे मिळवून देण्याच्या बहाण्याने दोन सख्ख्या भावांनी एका रियल इस्टेट व्यापाऱ्याला २० लाखांचा गंडा घातल्याची घटना भिवंडीत उघडकीस आली आहे. या फसवणूक प्रकरणी दोन सख्ख्या भावांवर भिवंडी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार प्रमोद प्रभाकर जाधव हे रियल इस्टेट एजंट असून ते भिवंडी शहरातील कोंबडपाडा परिसरात कुटुंबासह राहतात. प्रमोद यांना रियल इस्टेट व्यवसायात आर्थिक मंदी आल्याने ते कुठेतरी पैसे गुंतवणूक करून दरमहा ठराविक नफ्याच्या शोधात होते. दरम्यान भिवंडी महापालिकेमध्ये सफाई कामगार असलेला मनोज काळुराम खरे आणि त्याचा सख्खा भाऊ राष्ट्रवादीचा युवा नेता सूरज काळुराम खरे यांच्याकडे गुंतवणूक करून एक ठराविक रक्कमेचा नफा मिळणे बाबतची माहिती मिळाली होती.

त्यानुषंगाने दोघा भावांनी फिर्यादीला धामणकर नाका परिसरातील पद्मानगर, सिटी सेंटर बिल्डींगच्या पहिल्या मजल्यावरील गाळा नं. ११३ येथे बोलावून आरोपी सूरजने सांगितले की, माझा भाऊ मनोज खरे यांनी काँटेरा लिंक प्रायवेट लिमिटेड नावाची कंपनी सुरू केली आहे. सदर कंपनीचा सूरज काळूराम खरे हा डायरेक्टर आहे.

काँटेरा लिंक प्रायवेट लिमिटेड कंपनी ही निरामीती शेअर्स मध्ये इतरांचे पैसे गुंतवणुकीचे काम करते. त्यांना दरमहा ठराविक रक्कम नफा मिळवून देत असते, असे सांगून आरोपींनी प्रमोदला १ लाखांच्या गुंतवणुकीवर दरमहा १५०० ते २००० रुपये ठराविक रक्कम असा नफा मिळेल अशी हमी दिली. त्यामुळे प्रमोदने प्रथम १२ एप्रिल २०२३ रोजी ४ लाखांची गुंतवणूक केली. त्या मोबदल्यात आरोपींनी जाधव यांना प्रतिमहिना ४ हजार ५०० रुपये प्रमाणे देण्यास सुरू केले. त्यानंतर १३ एप्रिल ते १० ऑक्टोबर २०२३ पर्यंत प्रमोदने आरोपी सूरज व मनोज यांच्या खात्यात २० लाख रुपये जमा केले. जमा केलेल्या रक्कमेची वारंवार नोटरी करून करारनामाही करण्यात आला आहे.

दर्जेदार मराठी स्टेटस

बरेच दिवस उलटूनही गुंतवणुकीचा नफा आरोपी देत नसल्याचे प्रमोदने आरोपी भावांकडे रक्कम परत मिळण्यासाठी तगादा लावला असता आरोपींनी धनादेश दिले. मात्र ते सर्व धनादेश बँकेत अपुरा निधी असल्याने बाऊन्स झाले. तसेच प्रमोदने त्याचे १४ लाख ६८ हजार रुपये आरोपी भावांकडे वारंवार मागणी करून त्यांनी परत केले नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने प्रमोदने भिवंडी शहर पोलीस ठाणे गाठून आरोपी मनोज व सूरज या दोघा भावांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून घटनेनंतर आरोपी फरार झाले आहेत.

त्यामुळे कोणतीही आर्थिक गुंतवणूक करताना योग्य आणि विश्वासार्ह व्यक्तीकडे करावी. अती लोभ करु नये. नाहीतर आर्थिक नुकसान तर होतेच शिवाय मनस्ताप सहन करावा लागतो.

Join Us on Facebook

Trending

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *