भिवंडी तालुक्यातील पडघ्याजवळील बोरीवली गावातील एका कंपाऊंडमध्ये छापा टाकून 14 हजार 600 किलो सोलीव खैर लाकडाचा साठा जप्त करण्यात भिवंडी तालुक्यातील पडघा पोलिसांना यश आले आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बोरीवली गावातील एका बंद आवारात मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित खैर लाकडाचा साठा असल्याची गुप्त माहिती पडघा पोलिसांना मिळाली होती.
त्यानुसार पोलिस उपअधीक्षक प्रशांत ढोले व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुरेश मनोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पडघा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय साबळे, सहायक पोलिस निरीक्षक विष्णू किल्लेदार, संजय कदम, साळुंखे, पोलिस उपनिरीक्षक सुरेश परीट, पोलिस कर्मचारी घुगे पाटील, निमसे व पाटील या पथकाने गुप्त माहितीची खातरजमा करून पडघा वन विभाग कार्यालयातील क्षेत्रपाल शैलेश देवरे, वनपाल दिनेश माळी, प्रवीण आव्हाड आदींना पोलीस ठाण्यात बोलावून दोन पंचांना सोबत घेऊन बोरीवली क्रिकेट मैदानाजवळील एस.वाय. मुल्ला याच्या कंपाऊंडवर मध्यरात्री तीन वाजता छापा टाकण्यात आला. या एका छाप्यात 10 लाख 23 हजार 400 रुपये किमतीचे 14 हजार 620 किलो वजनाचे सोलिव खैर लाकूड जप्त करण्यात आले आहे.
सहायक पोलिस निरीक्षक विष्णू किल्लेदार यांच्या फिर्यादीवरून पडघा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे प्रतिबंधित लाकडाच्या तस्करीवर कारवाई करण्याची जबाबदारी वनविभागाची असताना बोरिवलीतील पडघा पोलिसांनी केलेल्या कारवाईने वनविभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Trending