महाराष्ट्रातील तमाम वीज क्षेत्रात काम करणाऱ्या बांधावाकरिता.
डॉ. प्रदिप सदाशिव निंदेकर
मुलुंड विभाग, भांडुप
खंबीरपणे उभा असलेला तू….
आधी कामं नव्हती म्हणून, हाताला रोजगार नव्हता म्हणून
खड्डे खोदत खोदत, नोकरीत सामावून घेतलेला तू…
कदाचित बापाकडे पैसा, परिस्थिती नव्हती म्हणून
जमेल तसं ITI करून नोकरीला लागलेला तू….
पोस्टमन जसा आधी
घराघरात पत्र पोहचवून आनंद पेरत असे
तसाच, गाव खेड्यात, वाड्या वस्तीत… वीज पोहचवून
अनेकांच्या जीवनात उजेड करणारा तू…..
सर्वाच्या गरजेची वीज अखंड पोहचवत असताना
सर्वांच्या विस्मरानातून हद्दपार गेलेला तू…
पण काही सेकंदासाठी वीज जाताच
मना मनातून स्मरणात येणारा तू…
डोंगर, दऱ्या, जंगल, खाडीमधून पसरलेलं विजेचं जाळं
रखरखत्या उन्हात, भर पावसात, रात्री, अपरात्री,
वेळप्रसंगी पुराच्या पाण्यातून पोहत जावून
जीवाची बाजी लावून वीज सुरळीत करणारा तू…….
वीजबिल वसुलीच्या आदेशाचे पालन करताना
ग्राहकांच्या मागे तगादा लावणारा तू
पण कुणाच्या घरातील वाईट परिस्थिती बघून
डोळे पाणावून, वेळ प्रसंगी स्वतःच्या खिशातून बिल भरनाराही तूच
कोरोना सारख्या महाभयंकर काळात दवाखाने, मेडिकल
औषध निर्माण कारखाने, पोलीस यंत्रणा यांनी विना खंड काम करावे
इतकेच काय, तर भर उन्हाळ्यात सर्वांनी सुखरूप शांततेत, आरामात घरातच राहावे
याकरिता, करोना वायरस ला फाट्यावर मारून फिल्ड वर असणारा तू….
बाहेर करोनाच्या थैमानाने शेकडो जीव जात असतानाच, अचानक
निसर्ग चक्री वादळाने रौद्र रूप दाखवून कोकणातील वीज यंत्रणा जमीन दोस्त केली
काही तासा अगोदर मिळालेल्या एका पत्राचा मान,
आणि सामाजिक दायीत्वाचे भान राखून
सकाळी एक Bag, चार कपडे, घरच्यांचा निरोप आणि डोळ्यात पाणी घेवून
सकाळी निघून, एक महिना… मुलाबाळांपासून, आईवडिलांपासून लांब राहून
वीज यंत्रणा सुरळीत करण्याचा चमत्कार करणाराही तूच…..
देशाच्या सीमेवर उभे राहून देशाची सुरक्षा करणारे जसे जवान
तसेच तिसरी महासत्ता होण्याचे स्वप्न बघणाऱ्या भारताच्या
प्रत्येक क्षेत्राला आवश्यक वीज निरंतर देण्यासाठी
अविरत पणे झटणारा, खंबीरपणे उभा असलेला तू….
खंबीरपणे उभा असलेला तू….
खंबीरपणे उभा असलेला तू….