कोकणातील ‘आगोट’
वैशाख वणव्यानंतर मृग नक्षत्रात वळीवाच्या पावसाची संततधार सुरू होते. कोकणात या काळाला एक गोड शब्द दिला आहे तो म्हणजे ‘आगोट’. बहुतांश शहरातील लोकांसाठी उन्हाळ्यानंतर जो येतो तो पावसाळा अशी संकल्पना असली तरीही या उन्हाळा आणि पावसाळ्याचा मध्यबिंदू आगोट असतो. आगोटची सुरुवात होण्यापूर्वी गावांतील आणि काही शहरांतील देखिल घराघरांमध्ये आगोटचे वारे वाहू लागतात.
कोकणातील लोकांसाठी आगोट हा जिव्हाळ्याचा तसेच कर्तव्यपूर्तीचा शब्द. आगोट म्हणजेच पावसाळ्यापूर्वीची तयारी. साधारण मार्च महिन्यानंतर ते मे महिन्याच्या अखेरपर्यंत या आगोटची लगबग कोकण पट्ट्यात सर्वत्र दिसते. या आगोटमध्ये पावसाळ्यात लागणाऱ्या दैनंदिन जिन्नसांची साठवण व तरतूद करून ठेवली जाते, सोबतच पावसाळ्यापूर्वीची कामे उरकून घेतली जातात.
कोकणातील भूमिपुत्रांचा शेती व मासेमारी हाच मुख्य व्यवसाय असल्याने पावसाळ्यात सगळे शेतीच्या कामामध्ये गढुन गेलेले असतात. पुर्वीच्या काळी व्यापार व वाहतूक बंदरमार्गाने होत असल्याने समुद्र व बंदरांना फार मोठे महत्त्व होते. दैनंदिन वापरातील व व्यवहारातील जिन्नस केवळ बंदर व तालुक्याच्या ठिकाणी उपलब्ध होत असत. दळणवळणाची साधने, रस्त्यांच्या सुविधा आणि शेतकऱ्यांची मिळकत मर्यादित असल्याने अशा छोट्या व्यापारी पेठांना दैनंदिन जीवनात महत्वाचे स्थान होते.
पावसाळा सुरु झाल्यावर कोकणातील ग्रामीण भागातील शेतकरी शेतीच्या कामांमध्ये गर्क झाल्यावर दैनंदिन वापरासाठीच्या जिन्नसासाठी बाजारपेठेत किंवा शहराच्या ठिकाणी फेन्या मारणे शेतकऱ्यांना शक्य नसल्याने पावसाळ्यात लागणाच्या जिन्नसाची खरेदी आधीच करून ठेवणे ही त्या काळातील शेतकऱ्यांची महत्वाची गरज होती. पावसाळ्यात लागणाऱ्या जिन्नसांचा साठा पावसाळ्यापुर्वीच घरात करून ठेवल्यास दररोजच्या जेवणासाठी लागणारे जिन्नस घरातच उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांची गैरसोय होत नसे. याच मुख्य गरजेतून आगोटची संकल्पना रूढ झाली असावी.
आजही आगोटच्या निमित्ताने शहरांतील बाजारपेठा माणसांनी आणि जिन्नसांनी भरून जातात. धान्य, किराणा, कपडे, सुकी मच्छी, इतर जिन्नसांची खरेदी करण्यासाठी कोकणातील ग्रामीण भागातील तसेच मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यातील गावठाणांतील लोकांची झुंबड उडते. याशिवाय याच काळात लग्नसोहळ्यांची रेलचेल असल्याने बाजारपेठा खूप गतीमान दिसतात. कांदे बटाटे, लसूण यांसारख्या दैनंदिन वापरातील वस्तूंचे दर एप्रिल ते मे या काळात ग्राहकांच्या आवाक्यात असतात त्यामुळे अगदी चार सहा महिन्यांचे कांदे, बटाटे, लसूण, सुके खोबरे, कडधान्यांची खरेदी लोकांकडून आगोटसाठी केली जाते.
भात व मासे हे कोकणातील आहारातील मुख्य पदार्थ आहेत. जून महिन्यापासून पुढील तीन महिन्यांपर्यंत कोकणात मासेमारी बंद असते. नारळी पौर्णिमेला दर्यासागराला नारळ देऊन मासेमारीसाठी बोटी समुद्रात सोडल्या जातात. तोवर गोड्या पाण्यातील मासे, खेकडे उपलब्ध असले तरीदेखिल अनेकांना शेतीच्या कामांमुळे असे मासे खेकडे पकडणे शक्य होत नाही त्यामुळे बाजारात कमी प्रमाणात उपलब्ध होतात. अशा परिस्थितीत गैरसोय होऊ नये यासाठी करंदी, जवळा, बोंबिल, ढोमा, मांदेली, सुरमई, बांगडा, कोलीम, कोलंबीचे सोडे अशा प्रकारच्या सुक्या मासळीची खरेदी मोठ्या प्रमाणात केली जाते. विकत घेतलेली सुकी मासळी उन्हात वाळवून, तुकडे करून ती पावसाळ्यासाठी हवाबंद बरण्यांमध्ये भरून ठेवली जाते.
कोकणात एप्रिल ते मे या काळात मसाला तयार करण्याची पारंपारिक प्रथा आहे. लाल सुकी मिरचीबरोबर हळकुंड, दालचिनी, धणे, जायफळ, खसखस, वेलदोडा, दगडफूल, मिरी, लवंग यांसारख्या गरम मसाल्याच्या पदार्थांची खरेदी करून, उन्हात वाळवण करुन संपूर्ण वर्षभरासाठी आगरी मसाला, कोळी मसाला, मालवणी मसाला, कोकणी मसाला, गरम मसाला, मिरचीपूड या प्रकारचा मसाला केला जातो. संपूर्ण वर्षभर खात्रीशीर पुरतील असं कैरी, भोकर, अंबाडी, लिंबू यांचं लोणच केलं जातं. वर्षभराचे पापड, फेण्या, कुरडया, सांडगे बनवण्यात येतात. ज्यांना बनवणं शक्य नाही ते मसाला, लोणचं, पापड वैगरे विकत आणून सोय करतात.
आजही काही प्रमाणात मुंबई, नवीमुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, भिवंडी, रायगड तसेच बहुतांश कोकणातील गावठाणांमध्ये कौलारु घरे आहेत. पावसाळ्यात घरात पाणी गळू नये म्हणून कौलं बसवली जातात, दुरुस्ती केली जाते, ताडपत्री टाकली जाते. ग्रामीण भागात ज्यांची शेती आहे ते जमिन नांगरून ठेवतात जेणेकरून पावसाळ्यात चिखल होऊन पेरणी करणे सोपे जाते. नांगर, ट्रॅक्टर, कुदळ, फावडी अशी शेती करण्यास लागणाऱ्या यंत्र, हत्यारांचीदेखिल डागडुजी करण्यात येते. हा देखिल आगोटचा भाग आहे.
तांदळाच्या भाकऱ्या हा कोकणवासियांच्या ताटातील महत्त्वाचा पदार्थ आहे. आजही बहुतांश घरात गॅस शेगडी बरोबर भाकरी करण्यासाठी म्हणून मातीची चूल आढळते. या चूलीला लागणारे सरपण म्हणून अगदी दिवाळीपर्यंतचा लाकूडफाटा जमवण्याचा आगोट हाच उत्तम काळ असतो.
आज अगदी गल्लोगल्ली दुकाने आहेत, मॉल आहेत. शहरात तर घरबसल्या ऑनलाईन ऑर्डर दिली की सामान घरपोच येते. तरीही या काळात शहर, गाव भेद विसरून कोकणातील लोक या आगोटचा आनंद घेताना दिसून येतात. कारण त्यातून त्यांना कर्तव्यपूर्तीचा आनंद मिळतो. पावसाळ्यात वातावरण खराब झालेच तर संपूर्ण कुटुंबाची उपजीविका होईल अशी सोय घरात केलेली असते त्यामुळे ते निश्चिंत असतात. सर्वांनी करावी अशी ही ‘आगोट’ ची जय्यत तयारी
Trending