marathistatus.co

नायिका – ‘ती’ वेश्या – आणि ‘’ती’’ खऱ्या आयुष्यातील नायिका वाटायला लागली…….

ती’ वेश्या, हि कथामालिका वास्तविक स्व-अनुभवांवर आधारित असून यात मला आलेले काही वास्तविक अनुभव लेखणीच्या सहाय्याने उतरवण्याचा प्रयत्न करीत आहे.

Pradip S. Nindekar

          शरीर विक्री करणारी वेश्या म्हटलं कि सामान्यतः मनात त्यांच्या विषयी एक प्रकारचा राग, तिटकारा किंवा द्वेषाची भावना मनात येते. पण त्याचं विश्व हे फार वेगळे आणि भयंकर त्रासदायक किंवा सामान्य व्यक्तीच्या कल्पनेपलीकडील असतं. ज्याची आपण कल्पनाही करू शकत नाही. काही कारणाने रेड लाईट एरियामध्ये काम करीत असणाऱ्या वेश्याचं जीवन, त्याचं राहणीमान, बोलणं, वागणं, त्यांची दिनचर्या, कामाचे प्रकार, व त्यांचे अनुभव आणि भावना तसेच अपेक्षा मला जवळून अनुभवायला मिळाल्या.
          समाजकार्याचे शिक्षण घेत असताना तसेच एच. आय. व्ही. एड्स च्या जनजागृती कार्यक्रम व सर्वेक्षणाच्या कार्यादरम्याण विविध रेड लाईट एरियामध्ये मला काम करण्याची संधी मिळाली. ज्यामुळे माझ्या मनातील “त्यां’’च्या विषयीच्या असलेल्या चाकोरीबद्ध व विशिष्ट वलयांकित कल्पना आणि विचार बदलल्या गेले. त्यांचंच या छोट्या छोट्या कथांच्या स्वरुपात स्वअनुभव येथे लिहिण्याचा प्रयत्न करीत आहे.

वर्ष २००७

         मुंबईच्या कामाठीपुरा, पिला हाउस या भागातील हि गोष्ट. एका सामाजिक मोठ्या संस्थेमार्फत एच. आय. व्ही. एड्स या विषयी वेश्यांकडे येणाऱ्या ग्राहाकांची जागरुकता जाणून घेण्याकारीताचे आमचे सर्वेक्षणाचे काम सुरु होते. त्या दरम्यान आम्हाला वेश्यागमन करून आलेल्या ग्राहकांकडून सर्वेक्षणाचे फॉर्म भरून घ्यावयाचे असायचे. मुक्काम भायखळ्याला असल्यामुळे दुपारच्या जेवणाला कामाठीपुरा वरून भायखळ्याला जाने शक्य नसायचे. त्यामुळे त्याच क्षेत्रात एका चहा, नाश्ता, जेवण मिळत असणाऱ्या हॉटेल मध्ये दुपारचे जेवण घेणे व नंतर वेळ मिळाला कि चहा घेणे असा कार्यक्रम असायचा.

        अश्याच एके दिवशी दुपारी दोन ते अडीच वाजताची गोष्ट. ते संपूर्ण क्षेत्र रेड लाईट एरिया असल्यामुळे तिथे सगळी कडेच रस्याच्या दुतर्फा छोट्या छोट्या खोल्यांमध्ये ‘ते’ काम चालायचे. आणि ग्राहकांना हेरण्या आणि घेरण्याकरिता वेश्या रस्त्यावरती येणाऱ्या जाणाऱ्या व्यक्तींना आपल्या खास शैलीत अश्लील इशारे करून बोलवायच्या व कुणी जवळ आला तर, किंवा जबरदस्तीने थांबवून त्यांच्याशी आपली सेवा कशी असणार व त्या सेवेचे पैसे किती लागणार हे सांगायच्या. साहजिकच त्यांची तेथील बोलण्याची तऱ्हा वेगळी असायची. तर हॉटेलच्या पुढे रहदारीचा रस्ता व हॉटेलच्या आमने सामने रस्त्याला लागुनच ‘’त्या’’ कामाच्या वन प्लस वन खोल्या असलेली लांबच लांब चाळ होती. वन प्लस वन म्हणजे खाली ‘’ती’’ खोली आणि वर कदाचित रहायची खोली. तर साहजिकच माझी नजर वरच्या खोलीत गेली. त्या खोलीला मोठी खिडकी वजा गैलरी (Gallary) होती. ज्यातून आत काय चाललंय हे दिसत होतं.

त्या खोलीत ‘ती’ होती आणि सोबतच हाफपैंट आणि बनियान घातलेला एक पुरुष आणि एक चार पाच महिन्याचं छोटंसं बाळ होतं. तो पुरुष कोण होता ?????? तिचा नवरा…… कदाचित नाही……. अश्या स्त्रियांना नवरा असतो काय ?…….. माझाच मला प्रश्न…… मग तो दलाल किंवा ‘भडवा’ असेल कदाचित. कारण वेश्यांचा सौदा करणारा किंवा गिऱ्हाईक शोधून देणाऱ्याला ‘भडवा’ म्हणतात असे मला समजले होते. तो…… कोण होता तिचा, देवच जाणे. ‘ती’ एक मळकट साडी घालून होती आणि काम करता करता बाळाला खेळवत होती आणि तो पुरुष सिगरेटचा धूर सोडत काहीतरी बोलत होता. मी रस्त्याच्या विरुद्ध बाजूला असल्यामुळे आणि अंतर असल्यामुळे मला तेथील आवाज स्पष्ट येत नव्हता पण तिथे काय घडतंय हे मात्र नक्की समजत होते….

तुम्हालाही तुमची गोष्ट लोकांपर्यंत पोहोचवायची आहे. लगेच क्लिक करा

          थोड्या वेळात ती त्या बाळाला दुध पाजायला लागली आणि अश्यातच मला दिसले तो व्यक्ती तिच्याशी आवेशाने बोलायला लागला….. त्या पुरुषाला कोणत्यातरी गोष्टीवर तिचा राग आला आणि त्याने तिला एक कानशिलात मारली आणि त्या बाळाला हिसकावले आणि जोरजोरान हातवारे करत तिच्याशी भांडू लागला. आणि ते छोटंसं बाळ रडायला लागलं…. ती पण काहीश्या आवेश्याने त्याच्याशी बोलत होती. पण शेवटी स्त्रीच ना ती. जीला “सुसंस्कृत म्हणवल्या जाणाऱ्या सामान्य कुटुंबात” आणि “कुंटणखान्यात” सुद्धा पुरुषप्रधान संस्कृतीला सामोरे जावे लागते. त्या माणसाने रागानेच बाळाला पलंगावर एका बाजूला ठेवले आणि तिचे केस पकडून पलंगावर जोरात आपटले आणि तिला पाच सहा कानशीलात व पाठीवर लगावून दिल्या. ती पलंगावर खाली तोंड करून पालथी पडली होती म्हणून कदाचित ज्याच्याकरीता एवढा आटापिटा चालला होता आणि ते बाळ नऊ महिने ज्या पोटात होते ते “पोट” मार खाण्यापासून वाचले…………

        ‘ती’ बिच्चारी रडायला लागली. मला ती डोळे पुसताना दिसत होती पण तिला किती लागले याचा काही अंदाज बांधता येत नव्हता. थोड्या वेळातच तिने त्या बाळाला जवळ घेतले आणि परत दुध पाजायला लागली. पण त्या माणसाने रागाच्या आवेशातच त्या बाळाला परत हिसकावले आणि स्वतः त्या मोठ्या खिडकीवजा गैलरीत एका कडेला बसून एका बाटलीतून दुध पाजू लागला व तिला काहीतरी रागातच बोलतानाच स्वतः आणखी एक सिगारेट पेटवून धूर सोडू लागला. कदाचित तो तिला आत्ताच खाली जावून ग्राहक शोधायला सांगत असावा. आणि ‘ती’ च्या बाळाला सोडून आत्ताच जायला नकार असावा. शेवटी त्या पुरुषासामोरच तिने रडता रडता साडी बदलवून लाल रंगाचा चमकदार व तडक भडक ड्रेस घातला. कारण त्या छोट्याश्या खोलीमध्ये जागाच नव्हती. तेवढाच त्या बिचारीचा संसार असावा. ‘ती’ने स्वतःचा मेकअप करायला सुरुवात केली. पावडर, काजळ, लिपस्टिक हे सर्व लावता लावता आपला मेकअप खराब होऊ नये म्हणून कदाचित ती आपल्या अश्रूंच्या बांधाला डोळ्यातच साठवून ठेवण्याचा प्रयत्न करीत असावी. कारण पाण्याचा बांध फुटला तर शेती व गावे वाहून जातात… पण फक्त या दोन डोळ्यांच्या अश्रूंचा बांध फुटला तर तिचा आणि बाळाचा तो दिवस आणि पुढील काही दिवस वाहून जाणार होते.

        काही वेळातच ती सज्ज झाली….. स्वतःचं आणि त्या चिमुकल्या बाळाचं आणि कदाचित त्या माणसाचं सुद्धा पोट भरण्यासाठी नवीन गिऱ्हाईक शोधण्याकरिता. रीतीरीवाजाने आणि सामाजमाण्यतेने लग्न झालेल्या स्त्रीयांद्वारे आजकाल काहीना काही कारणाने कौटुंबिक हिंसाचार, घटस्फोट, हुंडाबळी अश्या केसेस कोर्टात सादर होत असल्याचे दिसून येतात. ‘ती’ तर या सुसंस्कृत समाजाचा समाजमान्य भागसुद्धा नव्हती. तर ‘ती’ने आपल्या वेदना, आपले दुःख कुणाकडे मांडायचे. सामान्य स्त्रियांकडे संसारात त्रास किंवा दुःख असल्यास मनमोकळेपणाने रडण्याकरिता हक्काचे आई-वडील, भाऊ, बहिण असते…… पण या चिमुकल्या बाळाच्या माऊलीने कुणाच्या खांद्यावर डोकं ठेवून रडायचे…….

        ती खाली ग्राहक हेरण्याकरिता आली तेव्हा तिच्या चेहऱ्यावर थोड्याच वेळेअगोदर वर घडलेल्या हिंसाचारात्मक प्रसंगाच्या पुसटश्या खुणासुद्धा नव्हत्या. जसा तिचा नवीन दिवस आत्ताच सुरु झाला, अश्या नवीन जोमाने आणि उमेदीने आणि तिच्या क्षेत्रात आवश्यक असलेल्या विशिष्ट मादकतेने ती येणाऱ्या जाणाऱ्या ग्राहकांना इशारे करू लागली. कारण रडका आणि पडका चेहरा घेवून जर ती उभी राहिली तर कोणताही ग्राहक तिच्याकडे येणार नाही याची तिला खात्री होती बहुतेक. कारण ग्राहकाला काही काळाकरिता का होईना प्रफुल्लीत वाटणाऱ्या, हसऱ्या चेहऱ्याच्या, सुंदर दिसणाऱ्या वेश्याच हव्या असतात. कारण ‘जो दिखता है, वही बिकता है’ आणि कदाचित भाव म्हणजेच ‘रेट’ याच बाबीने म्हणजे “दिसण्यानेच” ठरतो असे हे क्षेत्र आहे. त्याकरीताच आपले  दुःख, यातना, वेदना सर्व विसरून सदा आनंदी असल्यासारखं दिसावं आणि वागावं लागतं….. आणि ‘ती’नेही तेच केलं.

        या क्षणाला मला ती एखाद्या चित्रपटातील नायिकेसारखी वाटत होती……..

       ‘ती’ मेकअप आणि विशिष्ट प्रकारच्या ड्रेसमुळे सुंदर दिसत होती म्हणून नाही, तर अल्पश्या वेळेअगोदर (कौटुंबिक ?????) हिंसाचाराची बळी पडून सुद्धा, असह्य असा मार खावून सुद्धा, आपल्या चिमुकल्या बाळाला दुध पाजता पाजता, कदाचित त्याची भूकही मिटलेली नसावी अशा परिस्थितीत एका पुरुषाजवळ बाटलीने दुध पाजाण्याकरिता वर सोडून आलेली ‘ती’ नव्या तजेल्याने, प्रसन्नतेने व सर्व दुःख विसरून, कदाचित ते दुःख विसरलेय किंवा मला दुःख नाहीच आहे असा अविर्भाव आणून आपल्या कामाला लागली. चेहऱ्यावर केलेल्या मेकअप च्या पाठीमागे काय दुःख दडलंय हे त्या मातेलाच माहीत. आणि ती पुढे असलेल्या, पैसे देऊन तिचे शरीर उपभोगण्याकरिता आसुसलेल्या, अनेक चेहऱ्याच्या पण एकाच नीच, पिसाळलेल्या मानसिकतेच्या वासनांध जनावरांना, त्यांची शारीरिक भूक भागवण्याकरिता अपेक्षित असलेली मादकता दाखवण्यात यशस्वी झाली.  पैसे देवून कोणतेही शरीर उपभोगू शकतो या मानसिकतेच्या मनुष्य रुपी श्वापदाची शरीराची भूक भागवण्याकरिता आलेल्या एका प्राण्यासोबत त्याची शरीराची…. व आपली आणि आपल्या बाळाची पोटाची भूक भागावण्याकरिता खोलीच्या आत गेली….

          एवढ्या कमी वेळात, विपरीत परिस्थितीमध्ये, वागणुकीत, वर्तवनुकीत एवढा मोठा फरक आनणे, मनाच्या आत उठलेल्या वादळाचा साधा किंचितसा लवलेशही मुखावर न दाखवता आनंदी असणे किंवा तसे भासवणे फारच कठीण असते. पण वेळ, प्रसंग, अनुभव आणि नियती सर्वच शिकवून जाते. तिच्या वागणुकीवरून कुणीही तिच्यासोबत काही क्षणांअगोदर काय घडलं आहे हे जाणू शकणार नव्हते……

          म्हणूनच मला पैश्याकरिता अभिनय करणाऱ्या व रिटेक वर रिटेक घेवून परफेक्ट सिन देणाऱ्या चित्रपटातील नायिकेपेक्षा ‘’ती’’ खऱ्या आयुष्यातील नायिका वाटायला लागली…….

         असाच एक अनुभव घेवून आपल्या सेवेत लवकरच………..

प्रदिप स. निंदेकर
9326030860

Trending

No posts found.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *