नीट जा, कुणाच्या वाट्याला जाऊ नको, कुणाशी बोलू नको, जास्त वेळ बाहेर राहू नको, लवकर घरी ये इ. अरेरे..! तुम्ही पालक आहात का मालक ?
मुलींवर एवढ्या कोवळ्या वयामध्ये अनेक प्रकारची बंधने लादण्याची प्रथा देशात आहे किंवा आपल्याला विविध प्रकारे पहावयास मिळते. जसे, की एखादा मुलगा रात्री – बेरात्री घरी उशिरा आल्यावर जे उद्गार निघतात. ते इथे सांगण्याची काही आवश्यकता नाही, असे मला वाटते. हे तुम्हा सगळ्यांना ज्ञात असेल. पण, याउलट जेव्हा एखादी मुलगी रात्री घरी उशिरा परतते. तेव्हा तिचे स्वागत गोड शब्द सुमनांनी केले जात असावे, अर्थातच नाही..! तिच्यावर पाऊस सुरू होतो तो म्हणजे क्रोधाचा, संशयाचा इ. कुठे होतीस, एवढा उशिर का झाला, मैत्रिणी च्या घरी होतीस तर तिला फोन कर, कोणासोबत होतीस. अरेरे….! बस्स पुरे आता. काय वाटत असेल तिच्या मनाला, काय वाटत असेल तिच्या आत्म्याला. की, तिने रात्री घरी येण्याची चूक केली. अरे, तिला तोच प्रतिसाद द्या जो तुम्ही तुमच्या मुलाला देता. पहिल्यांदा तिला विचारा उशिर का झाला. मला फोन करायचा होता मी आलो असतो तुला घ्यायला. तू का एकटी आलीस ? आता, याद राख रात्री – बेरात्री घरी एकटी आलीस तर.. ह्या अश्या गोष्टी कुठेतरी एक आपुलकीची भावना निर्माण करतात.
तिला वाटते, की कोणीतरी आहे जो आपली जीवापाड काळजी घेतो. कमीत कमी तिला थोडे समाधान, तर वाटेल ज्या प्रकारे मी वर उल्लेख केल्याप्रमाणे तिला तश्या प्रकारचा प्रतिसाद दिला तर तिच्या मनावर होणारा घाव आपल्याला दिसणार नाही आणि आपण पाहू पण शकत नाही. कारण, ज्या गोष्टी प्रेमाने होऊ शकतात त्यात क्रोधाला निमंत्रण देणे व्यर्थच ठरेल. तसेच प्रेम आणि क्रोध हे एकमेकांचे वैरी आहेत. प्रेमामुळे घेतलेला निर्णय जीवन सुधारू शकतो तर याउलट क्रोधात उचललेले पाऊल अख्खे जीवन संपवू शकते.
याप्रसंगी मला आता चर्चेत असलेल्या “आफताब लव्ह स्टोरी” ची आठवण झाली. येथे या लव्ह स्टोरी बद्दल मला थोडे बोलावेसे वाटते. “मी पंचवीस वर्षांची आहे, आता माझे निर्णय मला घेऊ द्या,” म्हणून आई – वडिलांच्या मर्जी विरुद्ध घर सोडून जाणारी मुलगी, या हिंदू मुलीचा प्रियकर मुस्लिम असणे आणि तिने त्याच्यासोबत लग्न न करता उजड माथ्याने लिव्ह – इन – रिलेशनशिपमध्ये राहणे इतका तपशील देशातल्या सध्याच्या वातावरणात “लव्ह – जिहाद” ची आग पेटवायला पुरेसा; पण सुदैवाने (अजून तरी) तसे काही झालेले नाही.
म्हणजेच उद्देश असा, की आजकालच्या तरुणींनी आपल्या आवडीनिवडी स्वतंत्रपणे पाळाव्यात. आपले जीवन स्वतंत्रपणे जगावे. पण भविष्यात आपल्या आई वडिलांना शरमेने मान खाली घालावी लागणार नाही किंवा त्यांना भयंकर दुःख पोहोचणार नाही, याचे मात्र भान राहायला पाहिजे. त्याच प्रकारे आपल्या जीवनातील महत्त्वाचे निर्णय घेताना सर्वप्रथम आपल्या आई-वडिलांसोबत चर्चा करावी व नंतरच समोरचा निर्णय घ्यावा. परंतु, आजचे चित्र मात्र वेगळेच आहे. आजकालची युवा पिढी ही आपल्याच आई-वडिलांना पाहिजे तो सन्मान देत नाही, आदर करत नाही. वयाची अठरा वर्षे तर सोडाच, नुसते कॉलेजची हवा पुरेशी आहे यांना..!
चुकीने वडिलांनी हाती फोन जरी घेतला. तेव्हा आपण – “बाबा राहू द्या तुम्हाला नाही कळणार तुम्ही फोन बिघडवून टाकाल” वगैरे.. वडील – “पोरी हा मुलगा कोण आहे ग याला मी आतापर्यंत कुठेच नाही बघितलं” मुलगी – “बाबा तो माझा फेसबुक फ्रेंड आहे, तुम्हाला नाही कळणार. चला द्या माझा फोन..” अरेरेरे, निदान त्या जन्मदात्या बापाची तर किंमत ठेवा.. ज्या व्यक्तीने तुम्हाला इतरांसमोर कसे वागायचे, बोलायचे हे शिकविले आणि त्यालाच ही वागणूक.. अरे, हो तुमचे जीवन, तुमच्या इच्छा, तुमच्या महत्वाकांक्षा, तुमची स्वप्न.., तुम्ही तुमच्या परीने जिवन जगा. पण त्याच्यासोबत दोन शब्द प्रेमाचे बोला. शेवटी, आपल्या परिसरामध्ये निदर्शनास येणाऱ्या काही गोष्टींची वर्णन येथे करू इच्छितो. महाविद्यालयीन उंबरठ्यावरच शरीर – संगाचा अनुभव घेण्याची घाई आणि कोवळ्या गर्भपातांची संख्या वाढते आहे. सेक्स हा शब्द उच्चारलेला ज्या घराने कधी ऐकलेला नाही अश्या घरातल्या प्रत्येक मुलींना प्रत्यक्ष अनुभवाची ओढ आणि संधीही आहे.
अवेळी घेतलेल्या छोट्या लैंगिक अनुभवांचे हे आंधळे गारूड अनेकदा अख्खे आयुष्य संपवून टाकते. आपल्याला खरंच असे चित्र हवे आहे का ? म्हणून, आजच्या तरुणीने अवश्य आपले मन आपल्या आई-वडिलांजवळ मोकळे करावे. सरते शेवटी आणखी दोन शब्द सांगण्याचा मोह आवरत नाही. आपल्याला प्रेम म्हणजे काय प्रेमाची नेमकी व्याख्या काय आहे हेच जाणून घ्यायचे असेल तर.. बघा तो इतिहास ज्यामध्ये शिवाजी महाराज असे म्हणतात की शत्रूची बहीण म्हणजेच आपली बहीण.. बघा तो इतिहास ज्यामध्ये डॉ. बी. आर. आंबेडकर आणि रमाबाईंचे प्रेम हे आजच्या तरुणींना प्रेरित करणारे आहे. बघा तो इतिहास ज्यामध्ये म. ज्यो. फुले आणि सा. फुले यांचे निःस्वार्थ प्रेम दर्शविले आहे..
तुम्हालाही तुमची गोष्ट लोकांपर्यंत पोहोचवायची आहे. लगेच क्लिक करा
तुषार प्र. रामटेके
मो.७६६६९१६८९२
अमरावती.
Tushar Ramteke
7666916892